मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या १०० कोटींच्या कथित आरोपामुळे राज्यात बरीच चर्चा झाली. या प्रकरणाची ईडीकडून सखोल चौकशी सुरु आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देशमुख प्रकरणी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
७ डिसेंबर २०२१ रोजी ईडीकडून सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात कुंटे यांनी अनिल देशमुखांबाबत चौकशीत खुलासा केला. देशमुख गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदलीसाठी अनाधिकृत याद्या पाठवायचे अशी कबुली कुंटे यांनी चौकशीत दिली. या यादीत संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठे आणि कोणत्या पदावर बदली करायची याचा उल्लेख असायचा. देशमुख त्यांचे पीए संजीव पालांडे यांच्याद्वारे ही यादी माझ्यापर्यंत पोहचवायचे असं कुंटे यांनी सांगितले.
खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख या याद्या पाठवत असल्याने मी त्यास नकार देऊ शकत नव्हतो असं सीताराम कुंटे यांनी ईडीच्या चौकशीत म्हटलं आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अलीकडेच अनिल देशमुखांनी सचिन वाझेला ओळखत नसल्याचा दावा केला होता. तर या प्रकरणी परमबीर सिंह यांनी माघार घेतली आहे. तेव्हापासून देशमुख जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र आता सीताराम कुंटे यांच्या जबाबामुळे देशमुख यांच्याविरोधात ईडी काय पाऊल उचलणार हे पाहणं गरजेचे आहे.
अनिल देशमुखांवरील दोषारोपपत्राची कोर्टाकडून दखल
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या दोन मुलांवर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली. आरोपपत्राची दखल घेतल्यावर विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांनी आरोपींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबर २०२१मध्ये ईडीने देशमुख व त्यांच्या मुलांवर ७००० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. देशमुखांसह त्यांच्या दोन मुलांनाही ईडीने आरोपी केले आहे. त्यापूर्वी ईडीने १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांचाही समावेश आहे.आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना १ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. भ्रष्टाचार व पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत सीबीआयने २१ एप्रिल २०२१ रोजी देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवला. त्यानंतर ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.