मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना काही दिवसांपूर्वी एनआयएने अटक केली होती. दरम्यान, सध्या एनआयएकडून सचिन वाझेंची कसून चौकशी सुरू आहे. तसेच वाझेंविरोधात सबळ आणि भक्कम पुरावे उभे करण्यासाठी एनआयएचे अधिकारी युद्धपातळीवर तपास करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, एनआयएने आज रात्री सचिन वाझेंना घटनास्थळी नेत गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण करवून घेतले. (NIA takes Sachin Vaze to the scene near Antilia, recreate Crime Scene)
स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयएने सचिन वाझेंविरोधातील चौकशीचा पाश अधिकच आवळला आहे. दरम्यान, आज रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास एनआयएची टीम सचिन वाझे यांना मुकेश अंबानींचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाजवळील घटनास्थळी घेऊन गेली. तिथे त्यांच्याकडून स्फोटके ठेवतानाच्या घटनेचे नाट्यरूपांतर करवून घेण्यात आले. यावेळी एनआयएचे बडे अधिकारी आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्स उपस्थित होते. त्यांनी सीसीटीव्हीत दिसत असलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याची पडताळणी करण्यासाठी वाझेंना घटनास्थळावरील रस्त्यावर चालवून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले.
दरम्यान, आज सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत.