नरेश डोंगरेनागपूर : आधी तपास यंत्रणा आणि आता राजकीय वर्तुळात ज्याच्या नावामुळे प्रचंड मोठे वादळ आले, तो निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हिंदुराव वाझे याचे नागपूर कनेक्शन चर्चेला आले आहे. वाझे याला महिन्याला शंभर कोटी रुपयांचे कलेक्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचा आरोप करून पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी सर्वत्र खळबळ उडवून दिली असतानाच वाझेची कुंडलीवजा नियुक्तीची कारकीर्द शनिवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात त्याच्या नागपूर कनेक्शनचाही उल्लेख आहे.
२० जून १९९० ला पोलीस दलात दाखल झालेल्या सचिन वाजेची पीएसआय म्हणून पहिली पोस्टिंग ठाणे शहरातील मुंब्रा पोलीस ठाण्यात झाली होती. दुसरी पोस्टिंग ठाणे शहर मुख्यालय, तर तिसरी ठाण्यातच सीआयडीला झाली. त्यानंतर पदोन्नत अर्थात एपीआय झालेला वाझेची वर्णी मुंबई गुन्हे शाखेत लागली. या निवडीनंतर सचिन वाझेची बदली नागपूर शहरात झाली होती. मात्र तो येथे रुजू झालाच नाही. त्याने नागपुरातील बदली रद्द करून घेतली आणि नंतर पुन्हा रिपीटर म्हणून गुन्हे शाखेत मुंबईला रुजू झाला. त्यानंतर कोकण परिक्षेत्रात त्याची बदली झाली, मात्र त्याला कार्यमुक्त करण्यात आले नाही. पुन्हा रिपीटर म्हणून तो गुन्हे शाखेतच नियुक्त झाला. नंतर त्याला निलंबित करण्यात आले आणि नायगावला त्याची बदली झाली. नंतर वाझे पोलीस दलातून बाहेर गेला आणि परत मुंबई गुन्हे शाखेच्या क्राईम इंटेलिजन्स युनिट मध्ये रुजू झाला.
दरम्यान, ख्यातनाम उद्योगपती अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ सापडली आणि या स्कार्पिओमध्ये नागपुरात निर्माण करण्यात आलेली स्फोटके असल्याचे उघड झाले. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि सचिन वाझेला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. सध्या तो एनआयएच्या ताब्यात आहे. या घडामोडीदरम्यान मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झालेले परमवीर सिंग यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझेला महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याची जबाबदारी सोपविली होती, असा खळबळजनक आरोप केला. नागपूरचे रहिवासी असलेले माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण उचलून धरले आणि नागपूरचे रहिवासी असलेल्या गृहमंत्री देशमुख यांच्यावर तोफ डागून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घडामोडीची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच सचिन वाझे याच्या नियुक्तीपासून तो आजपर्यंतच्या कारकिर्दीचा विस्तृत उल्लेख असलेली टिपनी वजा २ पानांची नोट सर्वत्र व्हायरल झाली आहे. या टिपणी तून नागपूर आणि सचिन वाझेचे अप्रत्यक्ष कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेला आले आहे
नागपूर कनेक्शन आणि चर्चाआधी स्फोटक नागपुरातील असल्याचे कनेक्शन, नंतर नागपूरनिवासी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, त्यानंतर गृहमंत्र्यांवर परमवीर सिंगांकडून लावण्यात आलेला आरोप आणि या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या वाझेची गृहमंत्री देशमुखांच्या होम टाऊन मध्ये बदली होऊनही तो येथे नियुक्त न झाल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेली माहिती पुन्हा एकदा नागपूरला चर्चेत आणणारी ठरली आहे.