उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटक कार व ठाण्यातील व्यावासायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेचा सीआययूमधील सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. वाझेच्या सूचनेनुसार त्याने पुरावे नष्ट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. रविवारी कोर्टात हजर केले असता त्याला काेर्टाने १६ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मात्र NIA ने भा. दं. वि. कलम ३०२, २०१, २८६, ४६५, ४७३, १२० (ब), ३४आणि UAPA कायद्याच्या कलम ४ (अ)(ब)(आय) अन्वये काझीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडदेव सशस्त्र पोलीस दलात नेमणूक केलेल्या काझीचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे १० एप्रिलपासून पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सशस्त्र पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्र यांनी माहिती दिली.
निलंबनाच्या काळात महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ च्या नियम ६८ आणि ६९ प्रमाणे त्यांना निर्वाह भत्ता व इतर भत्ते मिळणार आहेत. या कालावधीत त्यांना खाजगी नोकरी अथवा खाजगी धंदा करता येणार नाही. या प्रकरणातील ही एकूण चाैथी तर मुंबई पोलीस दलातील दुसरी अटक आहे. त्याचा सहकारी प्रशांत ओव्हाळ याच्याकडेही एनआयएकडून सातत्याने चौकशी करण्यात येत आहे.
१६ एप्रिलपर्यंत कोठडी
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी वाझेला १३ मार्चला अटक करण्यात आली. त्यानंतर एनआयएने काझी व ओव्हाळ यांच्याकडे सातत्याने चौकशी करून वाझेच्या कृत्याबद्दल माहिती गोळा करत होते. वाझे, निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे व नरेश गोर हे प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असले तरी वाझेने त्याच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या मदतीने ठाण्यातील त्याचे साकेत सोसायटीचे तसेच बनावट नंबरप्लेट बनविणाऱ्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज, डिव्हीआर काढून घेतले होते. ते रेकॉर्डवर न ठेवता नष्ट करून बीकेसी परिसरातील मिठी नदीच्या पात्रात टाकले होते, जेणेकरून तपास यंत्रणेच्या हाती ते पुरावे लागू नयेत, मात्र तपासात या बाबी उघड झाल्याने काझीला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. रविवारी कोर्टात हजर केले असता त्याला काेर्टाने १६ एप्रिलपर्यत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कोण आहे रियाजुद्दीन काझी ?
एपीआय रियाजुद्दीन काझी हा खात्याअंतर्गत २०१० झालेल्या उपनिरीक्षक परीक्षेतील अधिकारी आहे. १०२ व्या बॅचमधील काझीचे तपास कामाबरोबरच इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतला ताे अधिकारी होता. वाझे मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागात (सीआययूम) रुजू झाल्यानंतर काझीने अन्यत्र बदलीसाठी विनंती केली होती. मात्र, वाझेने त्याला आपल्या सोबत काम करण्यास सांगितले होते. त्याच्याशिवाय एपीआय प्रकाश ओव्हाळ यांच्याकडेही याप्रकरणी चौकशी सुरू आहे.