मुंबई - मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी सचिन वाझेंना अटक केल्यानंतर आता एनआयएने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केले आहे. (Sachin Vaze Case) या प्रकरणात वापरण्यात आलेली इनोव्हा हस्तगत केल्यानंतर एनआयएने आज एक मर्सिडिझ गाडीही जप्त केली आहे. तसेच ही मर्सिडिज गाडीच्या सचिन वाझेंशी असलेल्या कनेक्शनबाबतही माहिती दिली आहे. (NIA IG Anil Shukla Says, NIA has seized a black colour Mercedes Benz, Sachin Vaze used to drive this car )
आज संध्याकाळी ही काळी मर्सिडीज ताब्यात घेतल्यानंतर एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गाडीची कसून तपासणी केली. तसेच त्यामधून अनेक वस्तू ताब्यात घेतल्या. दरम्यान, ही मर्सिडीज पोलीस अधिकारी सचिन वाझे चालवायचे, असा गौप्यस्फोट एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांनी सांगितले की, एनआएने आज संध्याकाळी एक मर्सिडिज ताब्यात घेतली आहे. ही मर्सिडिज सचिन वाझे चालवायचे. तसेच या मर्सिडिजमधून स्कॉर्पिओची नंबरप्लेट, पाच लाख रुपये रोख रक्कम, नोटा मोजण्याची मशीन आणि काही कपडे जप्त करण्यात आले आहेत. आता ही मर्सिडीज कुणाची आहे, याचा शोध सुरू आहे, असे एनआयएचे अधिकारी शुक्ला यांनी सांगितले.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या चौकशीत मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणातील एनआयएची चौकशी जसजशी सुरू आहे तसतशा नवीन गोष्टीही समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणातील इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए आता मर्सिडीज कारचीही चौकशी शोध घेत होती. असे म्हटले जात आहे की, ही मर्सिडीज कारही तपासणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.