मुंबई : स्फोटक कारप्रकरणी अटकेतील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर लावण्यात आलेल्या आराेपांचा पर्दाफाश करण्यासाठी सीआययूमधील त्याच्या तत्कालीन सहकाऱ्यांची एनआयए मदत घेणार आहे. तेथील साहाय्यक निरीक्षक रियाज काझी व प्रशांत ओव्हाळ यांना सरकारी साक्षीदार बनविले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. दोघांकडे बुधवारी पुन्हा चौकशी करण्यात आली.
वाझेला अटक केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने रियाझ काझी व प्रशांत ओव्हाळ आणि अन्य तिघांकडे सातत्याने चौकशी सुरू ठेवली आहे. प्रश्नांचा भडिमार करून त्याच्या गुन्ह्यातील सहभागाबद्दल माहिती घेण्यात येत होती. मात्र स्फोटक कारप्रकरणी वाझेच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागाबद्दल कोणतेही धागेदोरे अधिकाऱ्यांना सापडलेले नाहीत. मात्र त्यांनी वाझेच्या कार्यपद्धतीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे काझी व ओव्हाळ यांना किंवा काझी यांना या गुन्ह्यात सरकारी साक्षीदार बनवावे, असे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे. त्याबाबत लवकरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांची बदली केली. त्यामध्ये या दोघांचा समावेश आहे. काझी यांची सशस्र दलात तर ओव्हाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.