मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याने आणि त्यात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाझे यांना एनआयएने (Sachin Vaze arrested by NIA) अटक केली आहे. तसेच त्यांना निलंबितही करण्यात आले आहे. या मोठ्या वादग्रस्त अधिकाऱ्यावर कारवाई झालेली असताना जेव्हा स्कॉर्पिओमध्ये स्फोटके सापडली तेव्हाचे वझे यांचे वागणे कसे होते ते समोर आले आहे. ( Sachin Vaze rude behavior with ATS officer, who came to see Scorpio at Antilia area. )
अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याचे समजताच दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी वाझे तिथे आधीपासूनच हजर होते. एटीएसच्या अधिकाऱ्याने वाझे यांना ती कार कुठे आहे असे विचारले. तेव्हा वाझे आरामात सँडविच खात होते. त्यांनी एका पोलिसाला बोलावून साहेबांना ती कार दाखव असे आदेश दिले. या त्यांच्या वागण्यावरून एटीएस अधिकारी आणि वाझेंमध्ये खटका उडाला. वाझेंच्या या वागण्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्याचे समजते. खरेतर एटीएसच्या अधिकाऱ्यांना वाझेंनीच स्वत: जाऊन घटनास्थळाची माहिती देणे गरजेचे होते. मात्र, प्रोटोकॉल न पाळता त्यांनी पोलिसाला आदेश देत स्कॉर्पिओ दाखविण्यास सांगितल्याने वाद झाला होता.
विधानसभेमध्ये अधिवेशनावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे सर्वात आधी घटनास्थळी गेले होते, असा आरोप केला होता. त्यावर वाझेंनी आपण नंतर गेल्याचे सांगितले होते. आता वाझे एनआयएच्या ताब्यात गेल्यानंतर हळूहळू तेव्हा घडलेल्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. या साऱ्या गुन्ह्याचे सूत्रधार सचिन वाझेच असल्याचे समोर आले आहे. एनआयएने स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ तिथे सोडून ज्या इनोव्हाने चालक पळून गेला ती इनोव्हादेखील ताब्य़ात घेतली आहे. ही इनोव्हा मुंबई पोलिसांचीच असल्याचे स्पष्ट झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता वाझेंचे काही सहकारी देखील अडकले असून कोठडीमध्ये आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे आणि वादसचिन वाझे हे आधीपासूनच वादग्रस्त आहेत. 16 वर्षांपूर्वी त्यांचे झालेले निलंबन यानंतर शिवसेनेने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाझेंना सेवेत घेण्यासाठी घातलेले गळ आदीमुळे शिवसेनेवर गंभीर आरोप होत आहेत. वाझेंनी शिवसेनेमध्ये देखील प्रवेश केला होता. आता शिवसेना सत्तेत आल्यानंतर वाझेंना पुन्हा पोलिस दलात घेण्याचा निर्णयही वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.