Sachin Vaze : सचिन वाझेंच्या भावाची उच्च न्यायालयात धाव; अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:27 PM2021-03-15T19:27:40+5:302021-03-15T19:29:12+5:30
Sachin Vaze : सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे.
मुंबई : अँटिलिया समोरील स्फोटकांच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेले निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. त्यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली आहे, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेत केला आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांडयांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. या कारचा मालक मनसुख हिरन यांचा काही दिवसांपूर्वी अचानक मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कळव्याच्या खाडीजवळ आढळला. या प्रकरणात सचिन वाझेंचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. परिणामी सरकारने वाझे यांची क्राईम ब्रँचमधून उचलबांगडी केली. मात्र, काहीही कारवाई न केल्याने एनआयएने या प्रकरणात हस्तक्षेप करत वाझे यांच्यावर गुन्हा नोंदवला. तीन दिवसांपूर्वी त्यांची जवळपास ११ तास चौकशी केली आणि त्याच रात्री त्यांना अटक केली. दरम्यान, ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला. त्यानंतर सचिन वाझे यांच्या भावाने उच्च न्यायालयात धाव घेतली.
सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना 'बळीचा बकरा' केला आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
एनआयएच्या कृतीवरून हे स्पष्ट होते की ते कुहेतून काम करत आहेत. ते केवळ आपल्या भावाची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी हे करत आहेत, असा आरोप सुधर्म यांनी केला आहे. वाझे यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. त्यांना ४१(ए) अंतर्गत नोटीस न देता तसेच एफआयआरची प्रतही देण्यात आली नाही. त्यांना अटकेचे कारणही सांगण्यात आले नाही. अशाप्रकारे एनआयएने फौजदारी दंडसंहितेचे उल्लंघन केले आहे. एनआयएने वाझे यांना अटक करण्यासाठी केलेल्या घाईवरून त्यांचा कुहेतु स्पष्ट होतो. एनआयए जाणुनबुजून कायद्याचे पालन करत नाही आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असेच याचिकेत म्हटले आहे. वाझे यांचा फरार होण्याचा विचार नाही. त्यांनी चौकशीसाठी एनआयएला सहकार्य केले. वाझे हे गेले १७ वर्षे मुंबई पोलीस दलात उच्च पदावर काम करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.