ठाणे : ठाणे न्यायालयाने मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) बुधवारी (दि. २४) सोपवल्यानंतर मुख्य आरोपी सचिन वाझेला गायमुख आणि मुंब्रा रेतीबंदर खाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी उशिरा आणले होते. हा खून नेमका कशा प्रकारे करण्यात आला याची माहिती आणि घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांनी यावेळी केला.
या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी वाझेला घेऊन एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांचे पथक गुरुवारी ठाण्यातील मनसुखचा मृतदेह मिळालेल्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ तसेच या खाडीपासून ४०० मीटर अलीकडे असलेल्या ठिकाणी गेले होते. मनसुख यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह घटनास्थळापासून ४०० मीटर अलीकडे टाकल्याचा एनआयएच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. तसेच घोडबंदर रोडवरील गायमुख खाडीजवळ तावडे असे नाव सांगत विनायक शिंदे मनसुख यांना भेटला होता. त्या ठिकाणीही सुरुवातीला वाझेला नेण्यात आले. त्यानंतर मुंब्रा रेतीबंदर खाडीपाशी काही काळ वाझे याची चौकशी केल्यानंतर हे पथक त्याला घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने परत गेले. दोनच दिवसांपूर्वी विनायक शिंदे याला घेऊन एटीएसचे पथक घटनास्थळी गेले होते. सध्या खून प्रकरणात वाझे याला ३ एप्रिलपर्यंत एनआयएची कोठडी न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी ठाण्यातील सर्व घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न एनआयएचे पथक करीत आहे. शिवाय, जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हत्या प्रकरणाचा एकमेकांशी कसा संबंध आहे, याचीही चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.......................
बेपत्ता काडतुसांचे काय झाले?
वाझे याला सरकारी रिव्हॉल्व्हर आणि ३० काडतुसे मिळाली होती. परंतु, त्याच्या घरझडतीमध्ये रिव्हॉल्व्हर आणि केवळ पंचवीस काडतुसे मिळाली. इतर काडतुसांचे काय झाले? याचीही यावेळी विचारपूस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली