मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने तपास सुरू करत पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक केली होती. आता सचिन वाझेंच्या (Sachin Vaze) चौकशीमधून एनआयएने या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आणली आहे. मात्र आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टासमोर (NIA Court) धक्कादायक विधान केले आहे. या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवलं जातंय, असे वक्तव्य सचिन वाझे यांनी कोर्टात केले आहे. (Sachin Vaze's shocking statement in court saying I am being made a scapegoat, made a big claim ...)
याबाबत कोर्टाला माहिती देताना सचिन वाझे म्हणाले की, या प्रकरणाशी माझे काहीही देणेघेणे नाही. मला या प्रकरणामध्ये बळीचा बकरा बनवलं जातंय. मी केवळ या प्रकरणाचा तपास करत होतो. मी आतापर्यंतच्या तपासात एनआयएला सहकार्य केले आहे. त्यामुळे मला पुन्हा एनआयए कोठडी देऊ नका, अशी विनंती सचिन वाझे यांनी केली. मात्र सचिन वाझेंची ही विनंती नाकारत सचिन वाझेंना ३ एप्रिलपर्यंत एनआयएची कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सचिन वाझे यांनीच ठेवली होती. असा दावा एनआयएने तपासानंतर केला आहे. तर मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये सचिन वाझे यांचा सहभाग होता. सचिन वाझे यांच्यासमोरच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली, असा दावा एटीएसने केला आहे.
काही दिवसांपूर्वी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर त्यांना एनआयए न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी दिली होती. या कोठडीची मुदत आज संपल्याने सचिन वाझे यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सचिन वाझेंना दणका देताना त्यांच्या एनआयए कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.