देशातील एक नंबरचे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याबाहेर अवैध स्फोटकं सापडली होती. यामध्ये सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सचिन वाझेंना अटक केल्यापासून एनआयएच्या तपासाला गती मिळाली आहे. आता पुन्हा एनआयएला सचिन वाझे स्फोटक प्रकरणात मोठी माहिती मिळाली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा कट हा मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये रचण्यात आला होता. याच हॉटेलमध्ये सचिन वाझे बनावट आधारकार्ड देऊन फेब्रुवारी महिन्यात राहत होते. सुशांत सदाशिव खामकर नावाने सचिन वाझे यांचे बनावट आधारकार्ड एनआयएने जप्त केलं.
सचिन वाझे यांचे बनावट आधारकार्ड समोर आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. याच आधारकार्डचा वापर करत वाझे हे ट्रायडेंट हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझे यांच्या बनावट आधार कार्डवर सुशांत सदाशिव खामकर असे नाव देण्यात आले आहे. त्यावर जन्म तारीखही लिहिण्यात आली आहे. तसेच फोटो सचिन वाझे यांचा वापरण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे एनआयएने ट्रायडंट हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. NIA ने या सर्व सीसीटिव्हींची तपासणी केली आहे. यातील एका तपासणीत एनआयएच्या हाती सचिन वाझे यांचे फुटेज लागले आहे. यात सचिन वाझे यांच्या हाती पाच मोठमोठ्या बॅगा दिसत आहे. सचिन वाझे १६ फेब्रुवारी पासून ते २० फेब्रुवारीपर्यंत ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत होते अशी माहिती एनआयएच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनआयएच्या पथकाने हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केली आहे. तसेच हॉटेलमध्ये एनआयएची टीम तपासासाठी पोहचली होती.