निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत NIA कोठडी ठोठावली आहे. सचिन वाझे यांनी मीडियाला ३ पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी २ कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचे आरोप केले आहे. हे कथित पत्र ३ पानांचे आहे. महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात असल्याने खळबळ माजली आहे.
या कथित पत्रात सचिन वाझेंनी पवार मला नोकरीवर ठेवू इच्छित नव्हते, अनिल देशमुखांनी सांगितले, मी पवार साहेबांची मी समजूत काढेन. मात्र, सचिन वाझे यांनी २ कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शवली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे धक्कादायक आरोप लावले होते, या प्रकरणात अनिल देशमुखांना खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआय(CBI) दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपा नेत्यांना ठाकरे सरकारवर टीका करण्याची आयती संधी सापडली होती. आता पुन्हा सचिन वाझेंच्या या नव्या लेटरबॉम्बमुळे महाविकास आघाडीला नव्या अडचणीला तोंड द्यावं लागणार आहे.
काय होता परमबीर सिंगाचा आरोप?
मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता.