मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सचिन वाझेकडे केलेल्या चौकशीमध्ये बार मालकाकडे उल्लेख केलेल्या ‘नंबर वन’ व्यक्तीबद्दलचा उलगडा केला असल्याचे समजते. नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांनी जमा केलेले ४.७० कोटी देशमुख यांच्यासाठी होते, या निष्कर्षावर अधिकारी ठाम आहेत.
कारमायकल रोडवरील कारमधील स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे हा गेल्या गेल्या ४ महिन्यांपासून एनआयएच्या ताब्यात आहे. ईडीने १० ते १२ जुलै या दरम्यान तळोजा कारागृहात जाऊन चौकशी केली आहे. मुंबईतून बार मालकाकडून गेल्या डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ४.७० कोटी वसूल केले होते. त्यासाठी तो ही रक्कम ‘नंबर वन’साठी असल्याचे त्यांना सांगत होता, असा जबाब बार चालकांनी दिला आहे, त्यामुळे ‘नंबर वन’ म्हणजे नेमके कोण आयुक्त की गृहमंत्री, याबद्दल त्यांच्यात संदिग्धता होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वाझेकडे चौकशी केली असता माजी गृहमंत्री यांना उद्देशून उल्लेख केल्याची कबुली दिली आहे, असे सांगण्यात आले. या तपासाची माहिती न्यायालयाकडे दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशमुखांच्या पुत्राकडून नवी मुंबईत भूखंडमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासांतर्गत ईडी त्यांच्या व कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्ता व आर्थिक व्यवहाराची पडताळणी करीत आहे. त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी नवी मुंबईतील उरण तालुक्यातील धुतुम गावात ८.३ एकर भूखंड खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे. पळस्पे फाटा ते जेएनपीटी या महामार्गावरील जागेची किंमत ३०० कोटी असून तो २००६ ते २०१५ या कालावधीत विविध टप्प्यात ग्रामस्थांकडून खरेदी करण्यात आला आहे. प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे हा व्यवहार झाला असून त्यावर सलीलकडून नियंत्रण ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले.