गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने ही रहस्यमयरीत्या गायब होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, तरी तिचा अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही. मात्र जीवरक्षक मिथू सिंह याने तिचा सेल्फी हा आपल्या फूड स्टॉलच्या प्रसिद्धीसाठी घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. अशाच ६० ते ७० ग्राहकांचे फोटो आपल्याकडे असल्याचा दावा त्याने केला आहे.
जीवरक्षक सिंह याचा बँडस्टॅन्ड येथे मित किचन नावाचा फूड स्टॉल आहे. पहाटेपर्यंत त्याठिकाणी ग्राहक आणि पर्यटकांची वर्दळ असते. या फुड स्टॉलवर येणाऱ्या लोकांचे सेल्फी घेऊन ते सोशल मीडियावर पोस्ट करत आपण फुड स्टॉलच्या प्रसिद्धी करतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. अशाच प्रकारे काढलेले अनेक जणांचे सेल्फी त्याने पोलीस तसेच साने कुटुंबियांनाही दाखविले.
वांद्रे पोलिसांनी त्याचे दोन्ही मोबाइल ताब्यात घेतले असून, ते मोबाइल बोईसर पोलिसांकडे पाठविण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी भायखळा येथील होस्टेलमधील सदिच्छाची खोली सील केली असून, तिच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. पोलीस अजूनही बँडस्टँडच्या वस्त्या पिंजून काढत आहेत. तसेच तिला शोधण्यासाठी आता सोशल मीडियासह बँडस्टॅडच्या बसस्थानकासह वांद्रे परिसरात ठिकठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले आहेत....म्हणून केला असावा बॉयफ्रेंडचा बहाणासदिच्छा हिचा कोणी बॉयफ्रेंड नाही. कदाचित सिंह हा तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत असावा, म्हणून तिने त्याला टाळण्यासाठी असा बहाणा केल्याचे तिचा लहान भाऊ संस्कार माने याचे म्हणणे आहे.