पणजी - गोव्यात अतिरेकी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील ज्यू प्रार्थना स्थळांवर (छाबड हाऊज) पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच इतर पर्यटन स्थळांच्या ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
न्युझिलंड येथील मशिदीत झालेल्या गोळीबारानंतर या घटनेचा बदला घेण्याची घोषणा आय एस व अल कायदा या अतिरेकी संघटनेकडून करण्यात आली आहे. मुंबई दिल्लीसह गोव्यातही मोठे अतिरेकी हल्ले करण्याची या संघटनेने योजना आखल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थेला मिळाल्यामुळे राज्याला सतर्क करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आल्याची माहिती गोव्याचे पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिली आहे.
जसपाल सिंग यांनी सांगितले ‘गोव्यात एकूण ३ ज्यू प्रार्थनास्थळे, म्हणजे छाबडा हाऊज आहेत. त्यातील हणजुणे व मोरजी येथे एक एक आहेत तर काणकोणमधील पाळोळे किनारा भागात एक आहे. हणजुणे व मोरजी येथील छाबडा हाऊज सध्या बंदच आहेत, परंतु काणकोणमध्ये चालू आहे. या छाबड हाऊसमध्ये शनिवार व रविवार असे दोन दिवस प्रार्थना होत असते. त्यामुळे या छबड हाऊजला सश्स्त्र पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे. गोव्यात या पर्यटन हंगामात २४०० इस्रायली नागरीक येवून गेले आहेत. केवळ दोन इस्रायली नागरीक दीर्घ व्हिसावर सध्या गोव्यात निवास करीत आहेत असेही सिंग यांनी सांगितले. केवळ यहुदी लोकांच्याच प्रार्थनास्थळांवर असे नव्हे तर पर्यटकांची आकर्षणे ठरलेल्या स्थळांवर अधिक खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.