औरंगाबाद : नाशिकमधील कंपनीत मुलाखतीला जाण्यासाठी शहरात आलेल्या माजी सैनिकाच्या मुलाला रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना गुरुवारी (दि.१९) रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत मुलाला रिक्षाचा क्रमांकही दिसला नव्हता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. जिन्सी पोलिसांनी शोध घेत बारा तासांत दोन्ही लुटारूंना पकडले. गणेश प्रेमदास पवार (२०, रा. ढाकेफळ तांडा, ता. घनसावंगी, जि. जालना) आणि दीपक अरुण गायकवाड (२५, रा. बार्शी नाका, बीड, दोघे ह.मु. गल्ली क्र. २, हनुमाननगर), अशी त्यांची नावे आहेत.
विकास भगवान चाटे (२०, रा. मेव्हणाराजा, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) हा विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात आहे. नाशिकच्या इंडियन फॅशन असोसिएशन कंपनीत त्याची २० जुलै रोजी सकाळी मुलाखत होती. त्यासाठी तो दि.१९ ला सिडको बसस्थानकात रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास पोहोचला. तेथून मध्यवर्ती बसस्थानकात जाण्यासाठी तो गणेश पवार याच्या रिक्षात (एमएच-२० ईएफ-३७२९) बसला. पवारचा साथीदार दीपक गायकवाड हादेखील होता. गणेशने मध्यवर्ती बसस्थानकाकडे निघाल्याचे नाटक करून विकासला कैलासनगरातील स्मशानभूमीतील मोकळ्या मैदानावर नेले. तेथे पवार आणि गायकवाडने त्याला चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. खिशातील मोबाईल, तीन हजार रुपये, शैक्षणिक कागदपत्रे आणि कपडे असलेली बॅग हिसकावत पळ काढला.
साईबाबांच्या मूर्तीमुळे लागला शोधदोन्ही लुटारू कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले नव्हते. अंधारात विकासला रिक्षाचा क्रमांकही दिसला नव्हता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. रिक्षात चालकाच्या हॅण्डलसमोर साईबाबांची मूर्ती असल्याची एकमेव खूण होती. तसेच दोघेही तोडकीमोडकी हिंदी बोलतात, हे विकासने पोलिसांना सांगितले. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, साईनाथ गिते, उपनिरीक्षक शेख रफिक, जमादार शेख हारुण, संपत राठोड, संजय गावंडे, गणेश नागरे, सुनील जाधव आणि बाळू थोरात यांनी खबऱ्यांना कामाला लावले. खबऱ्यांनी माहिती दिल्यावरून शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दोघांना आकाशवाणी चौकात रिक्षासह पकडण्यात आले.