रत्नागिरी : जिल्ह्यातील एका वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात इडीच्या अधिकाऱ्यांनी रिसॉर्टचे मालक आणि उद्योजक सदानंद कदम यांना आज शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. रिसॉर्टचा मुद्दा समोर असला तरी एका राजकीय पक्षाच्या सभेला आर्थिक पाठबळ दिल्यामुळे या कारवाईला वेग आला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सदानंद कदम यांना ईडीने अटक केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन दिलीय.
जिल्ह्यातील वादग्रस्त साई रिसॉर्टने मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. या रिसॉर्टची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आहे. या प्रकरणी इडीकडून एका उद्योजकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. विविध उद्योगात यशस्वी असलेल्या या उद्योजकावर राजकीय वक्रदृष्टी असल्याने अशा पद्धतीची कारवाई अपेक्षितच केली जात होती. रिसॉर्ट हे समोर दिसणारे कारण असले तरी त्यामागे अन्य काही कारणेही असल्याची मोठी चर्चा आहे. एका राजकीय पक्षाच्या सभेला माणसे आणण्यासह सर्व प्रकारचा खर्च या उद्योजकाने केला आहे. राजकारणात कोठेही थेट सहभागा नसलेल्या या उद्योजकाचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे या कारवाईला अधिक गती देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.