औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळासमोरील साई मंदीर फोडून चांदीच्या पादुका आणि चांदीचा मुकूट चोरणाऱ्या चोरट्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपींनी अन्य चार घर फोडल्याचे आणि विविध वाहनांच्या १५ बॅटऱ्या पळविल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून सुमारे पावणेतीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त मुलाचा (अल्पवयीन )समावेश आहे.
सचिन अशोकराव रोकडे, (वय २४), समाधान राजू डोळसे (वय १८) , राहुल दत्तू आव्हाड(वय १८, सर्व रा. ,रा. शहानगर, मसनतपुर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे म्हणाले की, १५ आॅगस्ट रोजी चिकलठाणा येथील साई मंदीर फोडून चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे मुकुट आणि चांदीच्या पादूका चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी प्रवीण प्रकाशराव कुलकर्णी यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना सचिन रोकडे हा या चोरीमागे असल्याची माहिती डी.बी. पथकाला समजली. अधिक तपास केला असता रोकडे हा मोरेगिर (ता. पाटण, जि.सातारा) येथे असल्याची कळाले. त्यास मोरेगिर येथे जाऊन पोलिसांनी पकडून आणले. त्याची कसून चौकशी केली असता अन्य तीन साथीदारांच्या मदतीने साई मंदीर फोडल्याची कबुली दिली. साईमंदीरातून चोरलेले चांदीच्या पादुका आणि चांदीच्या मुकुट काढून दिले. याशिवाय शेख नईम शेख चांद आणि भाऊसाहेब किसनराव सातदिवे यांच्यासह चार घरे फोडल्याची कबुली दिली. या घरातून पळविलेले सोन्याचे दोन सेवन पीस, सोन्याचे सहा मनीमंगळसुत्राच्या पोती, एक घड्याळ, चांदीच्या दोन अंगठ्या असा ऐवज काढून दिला. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे कर्मचारी मुनीर पठाण, गणेश राजपूत, विक्रम वाघ, शाहिद पटेल, नितेश सुंदर्डे, नवनाथ ढगे यांनी केली.