शिर्डी : साईबाबा मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगताप यांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने साईसंस्थान प्रशासनाने जगताप यांचा शनिवारी पदभार काढून घेतला.गुरूवारी रात्री साई पालखी मिरवणुकीपूर्वी मंदिरात राजेंद्र जगताप यांनी आपला हात धरुन मंदिराबाहेर काढल्याची तक्रार महिला काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने शिर्डी पोलिसात दिली होती़ मंदिरात सीसीटीव्ही बसविलेले आहेत. ते पाहून माझे निर्दोषत्व आपोआप सिद्ध होईल, असे जगताप यांनी म्हटले होते.पोलिसांनी शनिवारी साई संस्थान प्रशासनाकडे संबंधित सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. जगताप यांच्या निलंबनाचे अधिकार व्यवस्थापन समितीला असल्याने या घटनेचा सविस्तर अहवाल व्यवस्थापनापुढे ठेवण्यात येणार आहे.त्यावर १९ नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे संस्थान प्रशासनाने सांगितले. जगताप यांना तत्काळ पदावरून हटवून निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेसने मोर्चा काढला होता.
साईमंदिर प्रमुखाचा पदभार काढला; विनयभंगाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 2:14 AM