पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे राजकीय पूर्ववैमनस्यातून एका भावाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना रविवारी घडली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विलास गोगावले यांच्या गोठ्याजवळ ही हत्या करण्यात आली.या प्रकरणी अतुल गणपत मांढरे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर सात जणांना अटक करण्यात आली, तर ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माटवण येथील गणपत विश्राम मांढरे व सखाराम विश्राम मांढरे हे सख्खे भाऊ असून वेगवेगळ्या राजकीय पक्षांत असल्याने त्यांच्यात वाद होते. गावात शेकाप, शिवसेना असा वाद असल्याने पूर्ववैमनस्यातून रविवार सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गणपत मांढरे यांना रस्त्यात अडवून कोणत्या तरी हत्याराने मारहाण करून जीवे मारण्यात आले. घटनेमुळे पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली.पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित सखाराम विश्राम मांढरे व विठ्ठल कृष्णा मस्के यांच्यासह ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ जणांना ताब्यात घेतले आहे
या पार्श्वभूमीवर माटवण गावात राजकीय तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या घटनेनंतर आमदार भरतशेठ गोगावले, युवा नेते विकास गोगावले, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, माणगाव येथील डी.वाय.एस.पी. काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव करीत आहेत.पूर्वीपासून दोघांत वादच्एक भाऊ शेकापमध्ये तर दुसरा शिवसेनेमध्ये होता. त्यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. रविवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यातील वाद वाढला. या वेळी सखाराम मांढरे याने भावास बेदम मारहाण केली व तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.