पिंपरी : बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून एकाच जमिनीची दोघांना विक्री करुन चार कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज कुमार रमानी (रा. हरमस बिल्डिंग कॉन्वेंट स्ट्रीट कॅम्प, पुणे) व अली अकबर जाफरी (रा. नेपीएर रोड, कॅम्प पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हेमंत बागारेड्डी मोटाडु (वय ५४, रा. बंगला नं. १०, इस्ट स्ट्रीट कॉपोर्रेशन बँकेसमोर, कॅम्प पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरहोली बुद्रुक येथील सर्व्हे नंबर १०५ मधील जमीन २००५ मध्ये रमानी याने कुलमुखत्यारपत्र व विकसन करारनामा करुन हिरानंदानी प्रॉपर्टीज यांना दिली होती. त्यामुळे त्याचवेळी रमानी यांचा या जमिनीशी संबंध संपला होता. दरम्यान, त्यानंतर हिरानंदानी प्रॉपर्टीजकडून ही जमीन २०१२ मध्ये हेमंत बागारेड्डी व इतर चार जणांनी कुलमुखत्यार पत्र व विकसन करारनामा करण्यासह मोबदला देवून घेतली. परंतु जमीनीच्या सात बारावर रमानी यांचेच नाव होते. याचा गैरफायदा घेत अली अकबर जाफरी याच्याशी संगनमत करुन रमानी यानी १९९७ सालातील बनावट कुलमुखत्यारपत्र बनविले. व त्याआधारे दुरुपयोग करुन या जमीनीची त्यावेळी दोन कोटी रुपये किंमत असताना २४ लाखात खरेदी दस्त करुन जाफरी याने स्वत:च्या नावावर करुन घेतली. व नंतर पाच दिवसात जाफरी याने ही जमीन प्रदीप बधे व आकाशदीप कौल यांना ९५ लाख ७४ हजार ४६८ रुपयांना विकली. यामुळे या जमिनीच्या सात बारावर आता मालक म्हणून प्रदीप बधे व आकाशदीप कौल यांचे नाव दाखल आहे. तर, सध्या या जमिनीवर मोटाडू यांच्यासह इतर चार जणांचा ताबा आहे. या जमिनीची सध्याची किंमत चार कोटी रुपये आहे. या सर्व व्यवहारात रमानी व जाफरी यांनी एकमेकांंशी संगनमत करुन बनावट कुुलमुखत्यारपत्र व दस्त बनवून ही जमीन बधे व कौल यांनी विक्री केल्याने मोटाडु व इतर पाच जणांचे आर्थिक नुकसान झाले. यामध्ये चार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून जमिनीची विक्री; चार कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 5:16 PM
एकाच जमिनीची दोघांना विक्री करुन चार कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ठळक मुद्देचार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल