मुंबई : कॅटरिंगचे काम मिळवून देतो, म्हणून मुंबईच्या विवाहितेला राजस्थानमधील एका गावात नेले. तेथे वेश्याव्यवसायात ढकलण्याची भीती घालून, महिलेचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर सुटकेसाठी तिच्या कुटुंबाकडे दोन लाखांची मागणी केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली. कुरार पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश करत, महिलेची सुटका केली.
या प्रकरणात पोलिसांनी विवेक उर्फ विक्की रामानंद जागीड (२२), मुकेशकुमार बद्रीप्रसाद जांगीड (३७), कृष्ण कुमार (३३), परवीनकुमार जांगीड (३३), कविता प्रताप जाधव उर्फ सलमा अकबर भट्टी (३५), कुसुम उर्फ रेखा राजू शिंदे उर्फ रेखा दौलत निकम (४५) यांना अटक केली.
२ नोव्हेंबरला घरी आलेल्या कुसुमने तक्रारदार विवाहितेला गुजरात, राजस्थानमध्ये कॅटरर्सचे काम मिळून देते, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला, महिलेनेही कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल, म्हणून कुसुमला होकार दिला. ५ नोव्हेंबरला कामाच्या पाहणीसाठी टेÑनने कोसंब गुजरात येथे नेऊन ४ दिवस ठेवले. त्यानंतर, कुसुम व राजूने तक्रारदार महिलेस अहमदाबाद रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीसह गोडसा येथे पाठविले. पुढे विजय, कुसुम व राजू यांनी तिला कविताच्या घरी नेले. तेथे तिला १० दिवस ठेवले. तेथे प्रवीणने ३ ते ४ इसमांना तिला दाखविले. पुढे ते दाखवतील त्या व्यक्तीशी लग्न न केल्यास वेश्याव्यवसायात ढकलण्याची धमकी दिली. जबरदस्तीने तिचे ४० वर्षांच्या मुकेश कुमारसोबत लग्न लावून दिले. ‘मला घरी सोडा,’ अशी विनंती करूनही संबंधित महिलेवर अत्याचार करत तिला मारहाण करण्यात आली.
पैशांसाठी केला मुलाला फोन
२ डिसेंबरला मुकेशने महिलेच्या मुलाला फोन करून आई हवी असल्यास दोन लाख देण्याची मागणी केली. मुलाने पोलिसांत तक्रार दिली. कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक, महिला पोलीस अंमलदाराने शिताफीने तपास करत, महिलेची सुटका करत आरोपींना अटक केली.