उल्हासनगर : शहरा शेजारील नेवाळी नाका येथील एका किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेली ४ कोटी ५० लाख ७० हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्स पावडर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून शुक्रवारी दुपारी जप्त केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दुकानदार राजेशकुमार प्रेमचंद तिवारी व शैलेश राकेश अहिरवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यापैकी तिवारी याला अटक केली आहे.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका बदलापूर पाईपलाईन रस्ता, एकविरा ढाब्याजवळ राजेशकुमार प्रेमचंद तिवारी यांचे गायत्री नावाचे किराणा दुकान आहे. दुकानातून एमडी ड्रग्स पावडरची विक्री होत असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता दुकानावर धाड टाकून झाडाझडती घेण्यात आली. झाडाझडती मध्ये ३ किलो ६ ग्राम एमडी ड्रग्स पावडर मिळून आली. एमडी ड्रग्सची किंमत ४ कोटी ५० लाख ७० हजार असल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचें वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.
एमडी ड्रग्स पावडर विक्रीसाठी ठेवणारा किराणा दुकानदार राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी दिली. तर व एमडी पावडरचा साठा पुरविणारा शैलेश राकेश अहिरवार याचा शोध अन्वेषण विभाग घेत असल्याची माहिती पवार यांनी दिली. तपासात यातून मोठी माहिती उघड होण्याचे संकेतवरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली आहे. हिललाईन पोलीस ठाण्यात ४ कोटी ५० लाख ७० हजार किमतीचे एमडी ड्रग्स तसेच १ लाख ५९ हजार रुपयांचे मोबाईल व रोख रक्कम अशी एकून ४ कोटी ५२ लाख ३९ हजार रुपयांचे ऐवज जप्त केले. याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग तपास करीत असून तपासात एमडी पावडर साठा विषयी अधिक माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.