मुंबई : लस न घेताही अवघ्या दीड हजार रुपयात लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या दुकलीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. सहाद साजीक शेख (२१) आणि माविया अब्दुल हक भरणिया (२१) अशी त्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष १० चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. गोरेगाव पश्चिमेकडील काही जण बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पोलीस हवालदार सतीश कांबळे यांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने पालिका अधिकाऱ्याच्या सोबतीने मंगळवारी छापा टाकला. यादरम्यान शेख आणि भरणिया गुन्हे शाखेच्या हाती लागले. ही दुकली दीड हजार रुपयात लस न घेता नागरिकांना बनावट प्रमाणपत्र मिळवून देत होते. आतापर्यंत ७५ नागरिकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले. हे आरोपी गुजरातमधून रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले. यात आणखीन कोणाचा सहभाग आहे? याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे.
बनावट लसीकरण प्रमाणपत्राची दीड हजारात विक्री; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 9:10 AM