नाशिक : तामिळनाडू राज्यातील मुळ रहिवासी असलेल्या मोबाइल चोरट्यांच्या टोळीने मागील काही दिवसांपासून देवळालीगावाजवळील वालदेवी पुलालगतच्या रोकडोबावाडीत मुक्काम ठोकला होता. या टोळीतील चोरांच्या संशयास्पद हालचालींवरुन पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवत पर्दाफाश केला. अर्धा डझन चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्या ताब्यातील एकुण ५४ मोबाइल हस्तगत केले आहे.
रोकडोबावाडीत नव्याने वास्तव्यास आलेल्या परप्रांतीय तरुणांच्या हालचाली आणि वर्तणुकीवर येथील रहिवाशांना संशय आला. याबाबतची गोपनीय माहिती उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी प्रजित ठाकूर यांना मिळाली. ठाकूर यांनी या माहितीवरुन बारकाईने खातरजमा केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, कुंदन जाधव, उपनिरीक्षक विकास लोंढे, अतुल पाटील, अशोक साळवे, गणेश भागवत आदींच्या पथकाने शनिवारी (दि.७) संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास रोकडोबावाडी येथे संशयितांच्या घरी छापा मारला. यावेळी पोलिस पथकाला नाशिकसह जळगाव व इतर जिल्ह्यातून या चोरट्यांनी लांबविलेले नागरिकांचे सुमारे ५४ मोबाईल आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मुरली मुरुगुन (२४), जगदीशन पल्लानी (३०), व्यंकटेश शंकर (३३), मंगेश पेरूमल (३०), मोहन रंगन (३०), आरमुघम सुब्रमणी (३३, सर्व.रा.वेल्लूर) या सहा संशयितांना अटक केली.नाशिक, जळगाव व इतर जिल्ह्यातील या आंतरराज्यीय मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीकडून ५४ मोबाईल जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. संशयित हे काही दिवसांपूर्वीच जळगाव येथून नाशिकरोडला आल्याचे त्यांच्याकडे मिळालेल्या रेल्वे तिकिटावरुन स्पष्ट झाले आहे.