सालेमचा निकाह लांबणीवर; हायकोर्टाने पॅरोल याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 01:02 PM2018-08-07T13:02:04+5:302018-08-07T13:03:44+5:30
मुंब्रा परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय कौसर बहार या तरुणीशी त्याला निकाह करायचा असून यासाठी त्याने पॅरोल रजेचा अर्ज केला होता
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या ४५ दिवसांच्या पॅरोल रजेसंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली असून हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे अबू सालेमच्या निकाह रचण्याचे स्वप्न लांबणीवर गेले आहे.
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेमचा सहभाग, देशात विविध न्यायालयात सुरू असलेले खटले याबरोबरच पोर्तुगाल येथे बनावट पासपोर्ट प्रकरणाचा सुरू असलेला खटला या सर्व गोष्टींचा विचार करून हायकोर्टाने ही याचिका फेटाळण्यात आली आहे. याआधी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याने एप्रिल महिन्यात आपण लग्न करणार असून त्यासाठी त्याला सुट्टीची गरज असल्याने त्याने तळोजा कारागृहाच्या प्रशासनाकडे ४५ दिवसांच्या पॅरोलच्या रजेसाठी केला होता. हा अर्ज नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी फेटाळला होता. यानंतर अबू सालेम याच्या वकिलांनी पुन्हा मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. मुंब्रा परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय कौसर बहार या तरुणीशी त्याला निकाह करायचा असून यासाठी त्याने पॅरोल रजेचा अर्ज केला होता. सालेमने यापूर्वी मोनिका बेदी या अभिनेत्रीशी विवाह केला होता. मात्र, तो विवाह झालाच नव्हता, असा दावा मोनिकाने केला होता. २०१४ साली देखील अबू सालेमच्या धावत्या एक्प्रेस ट्रेनमधील लग्नाची चर्चा चांगलीच रंगली होती.