नवी दिल्ली : बॉलिवूडचा आत्महत्या केलेला कलाकार सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने आठवडाभरानंतर घ्यायचे ठरविले आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सोमवारी सुनावणीच्या वेळी याचिकादारातर्फे वकील उपस्थित न राहिल्याने ही सुनावणी न्यायालयाने एक आठवडा पुढे ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गेल्या सुनावणीच्या वेळीही याचिकादारांचे वकील न्यायालयात हजर नव्हते. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्याचा याचिकादाराने विचार करावा, असे आम्ही गेल्याच वेळी सांगितले होते, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले.
दिशा सालियन (वय २८ वर्षे) ही ८ जून रोजी मुंबईच्या मालाड (पश्चिम) येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली पडून मरण पावली. त्यानंतर १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास लावून आत्महत्या केली. या दोन घटनांमध्ये काही परस्परसंबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी वकील पुनीत धांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेत म्हटले आहे की, सुशांतसिंह व दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणांचा परस्परांशी संबंध आहे. दोघांचेही गूढ स्थितीत मृत्यू झालेले आहेत.
व्यावसायिकदृष्ट्या यशोशिखरावर असलेल्या या दोघांच्या मृत्यूनंतर खूप अफवा पसरल्या. त्यांना मारण्यासाठी कट रचण्यात आला होता, अशीही चर्चा रंगली होती. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचा मुंबई पोलिसांनी सादर केलेला अहवाल असमाधानकारक वाटला तर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा.सुशांतसिंह प्रकरणाचाही याचिकेत उल्लेखसुशांतसिंह राजपूतप्रकरणी बिहार पोलीस करीत असलेल्या तपासाला महाराष्ट्र पोलिसांनी सहकार्य करावे असाही आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, अशी विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे.