बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याची शेजारी केतन कक्कड यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. सलमान खानने आपला शेजारी केतन कक्कडवर मानहानीचा दावा ठोकला आहे. केतन कक्कड हा सलमानच्या पनवेलमध्ये फार्महाऊसमधील जमिनीचा मालक आहे. सलमान खानने शेजारी केतनवर आरोप केला होता की, तो त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. सलमान खाननुसार, केतनने एका यूटयूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत त्याच्या विरोधात काही बोलला होता. आता या प्रकरणाच्या नुकत्याच झालेल्या सुनावणीत सलमान खानने आपल्या वकीलाच्या माध्यमातून केतनवर विनाकारण आपली धार्मिक ओळख वादात खेचण्याचा आरोप केला आहे.
एका रिपोर्टनुसार, सलमान खानचे वकिल प्रदीप गांधी यांनी गुरूवारी झालेल्या सुनावणी दरम्यान केतन कक्कडच्या पोस्ट आणि मुलाखत कोर्टासमोर सादर केली. त्यांनी सांगितलं की, केतनने सलमान खानवर 'डी गॅंग' च्या माणूस असल्याचा, त्याच्या धर्मावर आणि तो राजकीय नेत्यांसोबत जुळला असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्याने असाही दावा केला आहे की, सलमान खान लहान मुलांच्या तस्करीत सहभागी आहे आणि त्याच्या फार्म हाऊसवर कलाकारांचे मृतदेह पुरले आहेत.
केतन कक्कडच्या या आरोपांना उत्तर देत सलमान खानने आपल्या वकीलाच्या माध्यमातून सांगितलं की, केतन कक्कडचे हे सगळे आरोप कोणत्याही पुराव्याशिवाय त्याच्या डोक्यातून निघालेले आहेत. एका संपत्तीच्या वादात तुम्ही माझी बदनाही का करत आहात? तुम्ही माझा धर्म मधे का आणत आहात? माझी आई हिंदू आहे, माझे वडील मुस्लिम आहेत आणि माझ्या भावांनी हिंदू मुलींशी लग्न केलं आहे. माझ्या घरात सगळे सण साजरे होतात'.
सलमान खान वकीलांच्या माध्यमातून असंही म्हणाला की, 'तुम्ही एक सुशिक्षित व्यक्ती आहात. तुम्ही गुन्हेगार नाहीत, जे अशाप्रकारचे आरोप लावत आहात. आजकाल लोकांना एकत्र करून सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करणं सोपं आहे'. सलमान असंही म्हणाला की, राजकारणात जाण्याची त्याची काही इच्छा नाही.
सलमान खानच्या केसनुसार, केतन कक्कडने एका यूट्यूब चॅनलसोबत बोलताना सलमान खान विरोधात अपशब्द वापरले होते. याप्रकरणी सलमान खानने यूट्यूबसोबतच सोशल मीडिया साइट्स जसे की, फेसबुक, ट्विटर आणि गूगलचं नाव आपल्या केसमध्ये घेतलं आणि त्यांच्याकडे मागणी केली की, हा आक्षेपार्ह कंटेंट वेबसाइट्सवरून काढला जावा किंवा ब्लॉक करावा.