मुंबईत काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्प शूटर सुक्खा याला मुंबई आणि हरियाणा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. ही अटक बुधवारी (१६ ऑक्टोबर) रात्री पानिपतमधील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.
या वर्षाच्या सुरुवातीला सलमान खानवर झालेल्या हल्ल्याचा कट रचण्यात सुक्खाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं म्हटलं जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगमधील असलेल्या याने पाकिस्तानातून तस्करी केलेल्या शस्त्रांचा वापर करून सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तपास सुरू आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या गँगशी जवळचा संबंध असलेला सुक्खा पाकिस्तानमधील डोगर नावाच्या हँडलरच्या संपर्कात होता. वांद्रे येथील सलमानच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर पळून गेलेल्या सुक्खाला पकडण्यासाठी तीन महिन्यांपासून पोलीस प्लॅनिंग करत होते.
'दैनिक जागरण'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका महिलेला त्याच्याशी मैत्री करण्याचं आणि आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम देण्यात आलं होतं. कालांतराने दोघांमध्ये वारंवार बोलणं व्हायचं. बुधवारी महिलेने सुक्खाशी संपर्क साधून ती पानिपत येथील अभिनंदन हॉटेलमध्ये राहत असल्याचं सांगितलं. तसेच मी तुला लोकेशन पाठवत आहे, इकडे ये असं सांगून बोलावलं.
सुरुवातीला सुक्खाला संशय आला. त्याने महिलेला आपल्याला अटक करण्यासाठी हे सर्व करत आहे का असं देखील विचारलं. पण तिने असं काहीही होणार नाही याचं आश्वासन दिलं. त्यानंतर तो भेटायला तयार झाला. मुंबई पोलीस त्याला अटक करण्याच्या तयारीत असून वरच्या मजल्यावरच्या खोलीत होते हे माहीत नव्हतं. सुक्खा हॉटेलच्या खोलीत दारू पित असतानाच मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकून त्याला पकडलं.