Salman Rushdie attacked: प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्टला प्राणघातक हल्ला करण्यात आला. न्यूयॉर्कमधील बफेलो जवळील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर असताना रश्दी यांच्यावर चाकूने १०-१२ वार करण्यात आले. त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. व्याख्यान देण्यापूर्वी CHQ 2022 कार्यक्रमासाठी ते स्टेजवर होते. त्यावेळीच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सलमान रश्दी यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या पुस्तकातील विचार मुस्लीमविरोधी असल्याचे काहींचे मत असल्याने त्यांना सातत्याने धमक्या येत होत्या. १२ तारखेला त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर, त्या हल्लेखोराने पोलिसांना धक्कादायक बाबी सांगितल्या.
पोलिसांनी कथित हल्लेखोराची ओळख पटवून त्याचे नाव हदी मतर (२४, फेअरव्यू, न्यू जर्सी) असल्याचे सांगितले आहे. "मला सलमान रश्दी अजिबात आवडत नव्हते. तो चांगला माणूस नाहीये. त्याने इस्लामवर हल्ला केला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याच्या वार होऊनही तो वाचल्याचे ऐकून मला आश्चर्य वाटले", असा धक्कादायक खुलासा त्याने केला. मात्र असे असले तरी हदी मतरने हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. १० ते १५ वार रश्दींवर केल्यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलं होतं. पण असे असूनही या गोष्टीचा हल्लेखोर इन्कार करत असल्याने विविध चर्चांना तोंड फुटले आहे.
रिपोर्ट्सनुसार, सलमान रश्दी यांच्यावर १५ वेळा चाकूने वार करण्यात आले. त्यांच्या मानेलाही मार लागला. यानंतर त्यांना विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीने स्टेजवर जाऊन रश्दींवर धारदार चाकूने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सलमान रश्दी यांच्यावर १०-१५ वेळा हल्ले झाले. हल्ल्यानंतर सलमान रश्दी रक्तबंबाळ झाल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले होते.