नवीन पनवेल : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगच्या चौघांना पनवेलसह बंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, गुजरात आदी राज्यांतून पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली. धनंजय तपेसिंग ऊर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया ऊर्फ न्हायी उर्फ संदीप बिष्णोई, वस्पि मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना, इशान झकरूल हसन ऊर्फ जावेद खान अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमानचे राहते घर, फार्महाउस, शूटींगच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शनिवारी दिली.
सलमान खान याला जिवे ठार मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगचे सदस्य हे पनवेल, कळंबोली परिसरात राहत आहेत. ते सलमानच्या वाजे येथील फार्महाउस किंवा मुंबईतील वांद्रे त्याचे राहते घर, शूटिंगच्या ठिकाणी पाळत ठेवून सलमानच्या येण्या-जाण्याच्या मार्गांवर त्यांनी रेकी केली असून, त्याला जिवे मारणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना मिळाली.
अशी केली कारवाईखबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलिस आयुक्त संजय येनपुरे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक नेमले. ही पथके बंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, गुजरात, दिल्ली या ठिकाणी दाखल झाली. संबंधित ठिकाणी सापळा लावून धनंजय तपेसिंग ऊर्फ अजय कश्यप याला पनवेल येथून, गौरव भाटिया ऊर्फ न्हायी उर्फ संदीप बिष्णोई याला गुजरात येथून, वस्पि मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना याला छत्रपती संभाजीनगर येथून आणि इशान झकरूल हसन ऊर्फ जावेद खान याला बंगळुरू येथून ट्रांझिट रिमांड घेऊन अटक केली.
आणखी आरोपींचा शोध कारवाईदरम्यान आरोपींकडून दोन मोबाइल जप्त केले आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना पकडण्यासाठी पनवेल शहर पोलिसांची पथके विविध शहरांमध्ये रवाना झाली आहेत.