उस्मानाबाद : तालुक्यातील सांजा येथील एका सलून व्यावसायिकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मनोज झेंडे असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. कोरोनाचे संकट तसेच गरिबीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.सांजा येथे मनाेज झेंडे यांचे सलूनचे दुकान होते. गतवर्षी एका मुलीचे लग्न केल्याने कर्जाचा डाेंगर वाढला हाेता. असे असतानाच पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सरकारने सलून बंद केले. परिणामी आर्थिक काेंडी झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले. यातूनच मनोज झेंडे यांनी शनिवारी विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी मनोज झेंडे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत मनोज झेंडे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
नेमकं काय म्हटले चिठ्ठीत?‘‘मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. काेराेना व गरिबीला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. आत्महत्येमुळे कुटुंबीयांना त्रास देऊ नये’’, अशी विनंती संबंधित चिठ्ठीच्या माध्यमातून मनोज झेंडे यांनी केली आहे.
हातावर पोट असणाऱ्या सलून दुकानदारांना कोरोनाचे नियम पाळून दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. हे करणार नसाल तर प्रत्येक नाभिक बांधवांना आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच सांजा येथील मृत मनोज झेंडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य करावे.- लक्ष्मण माने, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ.