जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन लागले व त्यात हाताचे काम बंद पडल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे संकट ठाकले, त्यातच या काळात ज्यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले, त्यांचा तगादा सुरु झाला. आधीच हाताला काम नाही. त्यात संकटावर संकटे येत असल्याने गजानन कडु वाघ (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, जळगाव मुळ रो/ माळपिंप्री, ता.जामनेर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८.३० वाजता घडकीस आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन वाघ हा तरुण पत्नी सरला, मुलगा ऋषीकेश (वय ५) व मुलगी वैष्णवी (वय ३) यांच्यासह लक्ष्मीनगरात भाड्याचे घर घेऊन वास्तव्याला होता. सलुन दुकानावर कारागिर म्हणून तो कामाला होता. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशातही लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ याची आर्थिक परिस्थिती पुर्णपणे ढासाळली. त्यामुळे त्यांनी हातउसनवारी करुन घरखर्च भागवण्यास सुरूवात केली. अनलॉक झाल्यांनतरही निर्बंधांमुळे पुरेसे काम मिळत नव्हते. तर दुसरीकडे डोक्यावरील कर्ज वाढत राहिले. त्यातच पैसे परत मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाला होता. याच विंवचनेत असलेला गजानन वाघ काही दिवसापासून अधिकच तणावात होता.
शनिवारी रात्री कुटुंबासोबत जेवण करुन सर्व जण झोपले. सकाळी ८.३० वाजता पत्नी सरला झोपतून उठल्या असता पतीने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी किंचाळी मारली. शेजारील नागरिकांच्या मदतीने लहान भाऊ ईश्वर यांनी गजानन याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी माळपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत वाघ यांच्या पश्चात पत्नी सरला, आई लताबाई, मुलगा ऋषीकेश (वय ५) व मुलगी वैष्णवी (वय ३) असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील सोनार तपास करीत आहेत.