उत्तर प्रदेशातील बांदामध्ये समाजवादी पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या गैरवर्तनामुळे महिलेने तिचा जीव दिला, असा कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे. एएसपी महेंद्रसिंग प्रतापसिंह चौहान यांनी सांगितले की, ४५ वर्षीय सुधा रायकर यांनी शनिवारी गळफास लावून घेतला.त्यांनी पुढे सांगितले की, ही महिला, तिचा नवरा आणि त्यांचा मुलगा खासगी कंपनी चालवतात, या लोकांनी त्यांच्या कंपनीसाठी अनेक लोकांकडून पैसे घेतले होते. दीपक शुक्ला नावाच्या व्यक्तीने त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी बोलावले होते, घरी परतल्यानंतर महिलेने आत्महत्या केली.
पोलीस स्टेशनमधून परत आल्यानंतर ती खूप रडत असल्याचे या महिलेच्या मुलींनी सांगितले.त्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, नंतर खोलीत बंद करून स्वत: ला गळफास लावून घेतला. त्याचवेळी, पोलिसांनी सांगितले की, या महिलेने आपल्या पती आणि मुलासाठी खासगी बँक उघडली होती, त्यात ५० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली होती, लोकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ४५ वर्षांची सुधा पुन्हा आपला भाऊ रामकरण राकवार यांच्यासह पोलीस स्टेशनला पोहोचली असा आरोप आहे. पोलिसांनी ज्यांना त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवायची होती त्यांना बोलावले, त्यानंतर पोलिसांनी रामकरणला अटक केली. संध्याकाळी आई खूप रडत असल्याचे या महिलेची मुलगी प्रिया आणि रोशनी यांनी सांगितले आहे.