बदलापूरमधील शाळेतील लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर झाल्याने महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा तापलेले असताना गुजरातमधून अत्यंत संतापजनक बातमी येत आहे. सहा वर्षांच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करत असताना तिने विरोध केल्याने आजोबाच्या वयाच्या मुख्याध्यापकानेच मुलीला मारून शाळेच्याच आवारात टाकल्याचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी आरोपी गोविंद नट याला अटक केली असून तो ५५ वर्षांचा आहे. महाराष्ट्रातील प्रकरण ताजे असताना गेल्या आठवड्यातील गुरुवारी रात्री एका लहान विद्यार्थिनीचा मृतदेह शाळेच्या आवारात आढळून आला होता. गुजरातच्या दाहोदमधील शाळेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती. पोस्टमार्टेममध्ये या मुलीचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचे समोर आले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासासाठी १० टीम बनविल्या होत्या.
मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गोविंद नटसोबतच ती विद्यार्थीनी शाळेत ये-जा करत होती. ती आली नाही तेव्हा तिने मुख्याध्यापक नटला फोन करून विचारणा केली. तेव्हा त्याने काही कामासाठी मी बाहेर गेलो होतो, असे सांगितले होते. मुलीच्या आईने पोलिसांना मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनाही मुख्याध्यापकाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी नटची मोबाईल लोकेशन तपासली तर तो दिवसभर शाळेतच होता. अखेर पोलीस खाक्या दाखविताच त्यावने गुन्हा कबुल केला.
सकाळी १०.२० ला मुलीला तिच्या आईने प्रिन्सिपलच्या कारमध्ये बसविले होते. परंतू, ती शाळेत आलीच नाही, असे तिच्या वर्गातील मुलांनी व शिक्षकांनी सांगितले. शाळेत जाण्यापूर्वी नटने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्यास विरोध करत ओरडण्यास सुरवात केली. यामुळे तिचा आवाज दाबण्यासाठी नटने तिचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला. मुख्याध्यापक तसेच तिला कारमध्ये लपवून ती कार शाळेत घेऊन गेला आणि दिवसभरात संधी साधून तिचा मृतदेह शाळेच्या आवारात फेकला. तसेच तिचे बुट आणि दप्तर त्याने क्लासरुमच्या जवळ फेकून दिले. पोलिसांनी गोविंद नटविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.