जितेंद्र कालेकर
ठाणे: बनावट कागदपत्रे दाखल करीत खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळविल्याच्या आरोपाखालीएनसीबीचे मुंबई विभागाचे वादग्रस्त माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा शनिवारी रात्री दाखल केला होता. याच संदर्भात वानखेडे यांना कोपरी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्याच अनुषंगाने बुधवारी सकाळी ११.३० वाजल्यापासून वानखेडे यांची चौकशी करण्यात येत आहे.
वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन नवी मुंबईतील हॉटेलसाठी परवाना मिळवल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे. वयाच्या सतराव्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यापाठोपाठ ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यांच्या बारचा परवानाही रद्द केला. कोपरी पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डीसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वानखेडे यांनी ठाणे पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करायचे आहे. त्यामुळेच आमचे आशील यात पोलिसांना सर्व सहकार्य करतील, अशी माहिती वानखेडे यांच्या वकिलांनी दिली. मुळात, हे प्रकरण १९९७ चे आहे. त्यावेळी वानखेडे यांचे वय हे कमी असले तरी आता त्यांच्या अटकेची आवश्यकता नसल्याचेही वकिलांनी म्हटले आहे.
दरम्यान, वानखेडे यांना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनाही अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलविल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.