महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यातील कलगीतुरा थांबण्याचे नाव घेत नाहीय. दिवाळीचे फटाके आता बॉम्ब फोडण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. शनिवारी सकाळी नवाब मलिक यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
समीर दाऊद वानखेडे यांनी आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण केले होते, महाराष्ट्र सरकारनेही एसआयटी स्थापन केली आहे, आता कोण वानखेडेंच्या कापाटातून सांगाडे बाहेर काढते ते पाहुया, असे सूचक वक्तव्य केले आहे. मलिक म्हणाले, मी एसआयटीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. आता एक नाही तर दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. एक राज्याची, एक केंद्राची. आता हे पाहणे महत्वाचे ठरेल, वानखेडेंचा कोण पर्दाफाश करतो आणि त्यांची खासगी आर्मीचा बुरखा फाडतो.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. यानंतर आता एनसीबीने मोठा निर्णय घेत, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणा शिवाय आणखी ५ केसेसचा तपास काढून घेतला आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून समीर वानखेडेची हकालपट्टी केल्यानंतर दिल्ली एनसीबीचे एक पथक उद्या म्हणजेच शनिवारी मुंबईत येत आहे. हे पथक मुंबई झोनमधील आर्यन खान प्रकरणासह इतर ५ अशा ६ प्रकरणांची चौकशी करेल.
मला तपासातून वगळण्यात आलेले नाहीमला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे. माझी बदली झालेली नाही. मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत. फक्त माझ्याकडील ६ केसेस दिल्लीतील टीमकडे देण्यात आल्या आहेत, असे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.