ईडीने राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. थोड्याच वेळात त्यांच्या कोठडीबाबत निर्णय येणार आहे. तर दुसरीकडे तत्कालीन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे कोपरी पोलीस ठाण्यातून बाहेर पडले आहेत.
नवी मुंबईतील सद्गुरू बार परवाना प्रकरणी ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी वानखेडे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठविली होती. यानुसार वानखेडे हे आज कोपरी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सुमारे साडे सात तास त्यांची चौकशी सुरु होती.
दोन फेब्रुवारीला ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या मालकीच्या सद्गुरू बारचे लायसन रद्द केले होते. लायसन घेताना वानखेडे यांनी खोटे वय दाखविल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या नावावर एक रेस्ट्रो बार आहे. या रेस्ट्रो बारचे नाव सद्गुरू असून, उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला होता. या बारचे लायसन ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता.
या प्रकरणी वानखेडे यांची आज चौकशी झाली. यावर वानखेडे यांनी आज आपल्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. कागदपत्रे सादर केली आहेत. चौकशीला सहकार्य करत आहे पुढेही बोलावले की सहकार्य करेन, असे सांगितले. तसेच नवाब मलिक यांना अटक झाल्याचे पत्रकारांनी विचारताच त्याबद्दल मला काही बोलायचे नाही असे म्हटले आणि कारमध्ये बसून निघून गेले.
कोपरी पोलीस काय म्हणाले...
कोपरी पोलिसांनी समीर वानखेडे यांचा 5 ते 6 पाणी जबाब जबाब नोंदवला आहे. समीर वानखेडे यांनी पोलिसांना सहकार्य केले. जे काही प्रश्न विचारले त्यावर समीर वानखेडे यांनी उत्तरे दिली आहेत. आवश्यकता वाटली तर वानखडे यांना पुन्हा बोलावण्यात येईल. गुन्ह्याच्या तपासात जे काही सिद्धी होईल त्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे, असे कोपरी पोलिसांनी सांगितले.