मुंबई : नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे असून, आपल्या कुटुंबीयांची जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत, असा खुलासा समीर वानखेडे यांनी केला.वानखेडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे हिंदू असून, ते ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यातून निवृत्त झाले. आई स्वर्गीय झहीदा या मुस्लीम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील असून, मला त्या वारशाचा अभिमान आहे.सोशल मीडियावर खासगी आयुष्याचे दस्तावेज प्रकाशित करणे चुकीचे आहे. माझे २००६ साली डॉ. शबाना कुरेशी हिच्याशी लग्न झाले होते. पण २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर क्रांती दीनानाथ रेडकर यांच्याशी लग्न केले. काही दिवसांपासून मंत्र्यांच्या वक्तव्यांनी मानसिक दबाव येत असून आपले स्पष्टीकरण न्यायालयात दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
धर्मांतर केले नाही : ज्ञानदेव वानखेडेमाझे नाव ज्ञानदेव वानखेडे असून, मी कधीही धर्मांतर केलेले नाही, असे स्पष्टीकरण समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दिले आहे. मंत्री मलिक हे खोटे आरोप करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.