मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांच्यावर अनेक उलटसुलट आरोप केले. तर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छापेमारीवेळी जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर साक्षीदार म्हणून सह्या घेण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील साक्षीदारानं केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालं आहे. साक्षीदाराच्या खळबळजनक आरोपांवरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आर्यन खानचा एक व्हिडिओ ट्विट करत नवा पुरावा समोर आणला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता भलतंच वळण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांनीमुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून "ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातं आहे, असा आरोप वानखेडे यांनी या पत्रात केला आहे. त्याचबरोबर माझ्यावर कोणतीही कारवाई करताना खात्री करा, अशी मागणीही वानखेडे यांनी केली आहे. माझ्यावर वाईट हेतूने करण्यात आलेल्या चुकीच्या आरोपांप्रकरणी कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होणार नाही याबाबत खात्री करा." अशी विनंती केली आहे.
या पत्रात समीर वानखेडे यांनी माझ्या निदर्शनास आले आहे की, एनसीबीमध्ये सुरु असलेल्या कारवाईत अज्ञात व्यक्तींनी मला खोटे ठरवण्यासाठी कट रचला असून माझ्याविरोधात कायदेशीर कारवाईची देखील योजना आखली आहे, असं म्हटलं आहे. तसेच हे तुमच्या निदर्शनास आणून देत आहे की, उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी यासंदर्भात ही बाब आधीच महानिदेशक, एनसीबीकडे पत्राद्वारे आवश्यक कारवाईसाठी पाठवली आहे.
त्याचप्रमाणे मी तुमच्या निदर्शनास आणून दिले आहे की, अत्यंत आदरणीय राजकारण्यांनी सार्वजनिक माध्यमांवर माझ्याविरोधात तुरुंगवास आणि बडतर्फीची धमकी दिली आहे, अशी माहिती पत्राद्वारे दिली आहे. या पत्राची प्रत राज्याचे पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस महासंचालक यांना देखील वानखेडे यांनी पाठवली आहे.