नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सनातन संस्थेचा उल्लेख केला. कोकणातील दाऊदच्या नावाची जागा सनातन संस्थेने घेतल्याचं मलिक म्हणाले. मात्र, लिलावात दाऊदची जागा खरेदी करणाऱ्या वकील अजय श्रीवास्तव यांनी केला हा खुलासा केला आहे. ''सनातन धर्म पाठशाळा ट्रस्ट'' ही माझी व्यक्तिगत ट्रस्ट, याचा कुठल्याही संस्थेशी संबंध नाही आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मदरश्यातून ज्या प्रकारे शिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे आम्ही सनातन धर्म पाठशाळेची सुरुवात करत आहोत. त्याचे पहिले केंद्र बनवण्यास आम्ही दाऊद इब्राहिमच्या जागेची निवड केली आहे. तेथून आम्ही सनातन धर्म पाठशाळेची सुरुवात करणार आहोत, असे स्पष्टीकरण वकील अजय श्रीवास्तव यांनी लोकमतशी बोलताना दिले आहे.
रत्नागिरी दाऊदच्या नावाची जागा सनातन संस्थेने घेतल्याचं मलिक म्हणाले.त्यावर आता सनातन संस्थेने सविस्तर खुलासा केला आहे. सनातन संस्थेने म्हटलं आहे की, मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील अॅड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि अॅड्. अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेसंदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करू नये. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे.