मीरारोड - भाईंदरच्या उत्तन - पाली येथील समुद्र किनारी वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून पाली येथील स्थानिक मच्छीमार ह्या वाळू माफियां विरुद्ध पुन्हा आक्रमक झाले आहेत. तर उत्तन पोलिस निरीक्षक यांची बदली होताच वाळू माफिया सक्रिय होतात असा अनुभव नेहमीच झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाईंदरच्या उत्तन येथील वेलंकनी समुद्र किनारी सोनेरी वाळू असते . तर पालीच्या शांती नगर पर्यंतच्या समुद्र किनारी सर्वसाधारण वाळू असते. ह्या भागात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला आहे. शासनाचा करोडोंचा महसूल बुडवत बेकायदा वाळू तस्करी हा बक्कळ कमाई चा मार्ग झाल्याने ह्यात काही बड्या लोकांचा समावेश असल्याची चर्चा आहे . तर उत्तन सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बदली होऊन गेले कि हे वाळू माफिया सक्रिय होत असल्याचा आता पर्यंतचा अनुभव चर्चेचा विषय आहे .
ह्या वाळू माफियांनी पूर्वी एका पोलिसाच्या अंगावर गाडी घातली होती . तर एका स्थानिक मच्छीमाराला वाळू माफियांनी गाडीने उडवल्याने गंभीर झालेल्या त्या इसमाचा काही काळाने मृत्यू झाला होता . हे वाळू माफिया मस्तवाल असतानाच पोलिसां कडून कठोर कारवाईची मागणी सातत्याने स्थानिकांनी चालवली आहे . किनाऱ्यावरील वाळू गोण्यां मध्ये भरून दिवस रात्र टेम्पोतून वा दुचाकी वरून वाळू तस्करी केली जाते. सतीश निकम हे उत्तन पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना मच्छीमारांच्या तक्रारीवरून वाळू माफियांना बऱ्यापैकी लगाम घातला होता. तर प्रशांत लांगी पोलीस निरीक्षक म्हणून हजर झाल्यावर सुरवातीला हे वाळू माफिया सक्रिय झाले होते . तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या कडे तक्रारी गेल्यावर त्यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते . त्या नंतर वाळू माफियांचा उच्छाद दिसत नव्हता.
मात्र लांगी यांची बदली झाल्यावर नवीन पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे हजर झाले आहेत. नव्या पोलीस निरीक्षक यांना काही माहिती मिळायच्या आधीच पाली समुद्र किनारी वाळू माफियांनी पुन्हा वाळू उपसा करून त्याची तस्करी चालविल्याने या प्रकरणी पालीच्या जागरूक मच्छीमारांनी वाळू माफियांना विरोध सुरु केला आहे. वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळू भरण्यासाठी व त्या गाड्यां मध्ये भरण्यासाठी मजूर ठेवले आहेत . सातत्याने गाड्यां मध्ये वाळूच्या गोण्या भरून तस्करी केली जात आहे . सदर प्रकार उत्तन पोलिसांच्या निदर्शनास आणून देत त्यांना निवेदन देणार असल्याचे मच्छीमार म्हणाले