अमरावती: माजी सरपंचपतीला बेदम मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचा गोफ व चेन हिसकावून पळ काढणाऱ्या तीन वाळू तस्करांना अकोला व बुलढाणा जिल्हयातून पकडण्यात आले. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने १३ एप्रिल रोजी ही यशस्वी कारवाई केली. अटक आरोपींना येवदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लोतवाडा येथे १० एप्रिल रोजी ती घटना घडली होती.
अटक आरोपींमध्ये शोहेब खान शकिल खान पठाण (२८), दिपक ऊर्फ लारा भाउराव मुळे (३०) व अमोल अजाबराव नेमाडे (२९, तिन्ही रा. वडनेर गंगाई ता. दर्यापूर) यांचा समावेश आहे. गुन्हयात वापरलेली कारदेखील पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी भीमराव विठठल कुऱ्हाडे (रा. लोतवाडा) यांनी येवदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. आरोपी शोहेब खान, दिपक मुळे व अमोल नेमाडे यांचा अवैध वाळू तस्करीचा व्यवसाय असून त्याबाबत कुऱ्हाडे हे पोलिसांत तक्रार करणार असल्याच्या कारणांवरुन त्यांच्यात वाद झाला. १० एप्रिल रोजी तीनही आरोपींनी कुऱ्हाडे यांच्या लोतवाडा गावात जाऊन त्यांना लाथा, बुक्कया व चाकुने मारहाण केली. तथा त्यांच्या गळयातील सोन्याचा गोफ व चेन हिसकावून नेली. यात येवदा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, दरोडा (जबरी चोरी) व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा नोंद केला होता.
नातेवाईकांकडे लपले होते
दरम्यान १३ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दर्यापूर उपविभागात गस्त घालत असतांना आरोपी शोहेब खान हा त्याच्या अकोला येथे नातेवाईकांकडे दडून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे त्याला अकोल्यातील फिरदोज कॉलनी येथून ताब्यात घेण्यात आले. तर अन्य दोघांना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात येत असलेल्या वाघूळ येथून पकडण्यात आले.
यांनी केली कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक संजय शिंदे, सहायक उपनिरिक्षक त्र्यंबक मनोहर, हवालदार सुनिल महात्मे, सुधीर बावने, सैयद अजमत, निलेश डांगोरे, अंमलदार दिनेश कनोजिया, हर्षद घुसे व सायबर पोलीस ठाण्यातील सागर धापड व सरिता चौधरी यांनी ही कारवाई केली.