सातारा - येथील सैनिक स्कूलच्या आवारातील चंदनाच्या झाडांची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडांचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत.सुनील संजय काळे, महेश बाळू बाबर (वय ३६), लक्ष्मण उर्फ बापू कुंदन भोरे (वय ३५, सर्व रा. आकाशवाणी केंद्राजवळ, नामदेववाडी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, काही वर्षांपूर्वी सैनिक स्कूलच्या आवारामध्ये चंदनाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांची गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चोरी होत होती. चार-पाच महिन्यांतून एकदा तरी या ठिकाणी चोरीचा प्रकार घडत होता. मात्र, चंदनाच्या झाडांची नेमके कोण चोरी करत आहे, हे समोर येत नव्हते. दरम्यान, चंदनाच्या झाडांची विक्री करण्यासाठी संशयित सुनील काळे हा सातारा फलटण रस्त्यावरील पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना खास खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला शनिवारी सायंकाळी तेथे तत्काळ पाठविले. त्यावेळी पोलिसांनी सुनील काळेसोबत असलेल्या महेश आणि लक्ष्मण या दोघांनाही तेथे अटक केली. पोत्यामध्ये ठेवलेले चंदनाचे तुकडे या तिघांकडून पोलिसांनी जप्त केले. सैनिक स्कूलसमोरील चंदनाच्या झाडांची चोरी हे तिघे नेहमी करत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.शहर पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिघांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आणखी कुठे त्यांनी या प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का? याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, हवालदार सुधीर बनकर, तानाजी माने, मुबीण मुलाणी, संतोष पवार, शरद बेबले, विजय कांबळे, नीलेश काटकर, प्रवीण फडतरे यांनी भाग घेतला.