विलास जळकोटकर, सोलापूर: घातक शस्त्राचा वापर करुन लोकांमध्ये दहशत पसरवून ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या संदीप प्रल्हाद चव्हाण (वय- ३८, रा. पारधी वस्ती, मुळेगाव, सोलापूर) या सराईत गुन्हेगाराला अखेर पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानब्ध कारवाईचे आदेश बजावले. त्यानुसार त्याची शनिवारी पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. यातील संदीप चव्हाण याच्याविरुद्ध शहरातील एमआयडीसी, जोडभावी पेठ, सलगर वस्ती पोलीस ठाण्यात जबरी घरफोडी, बेकायदा जमाव जमवून सशस्त्र हल्ला करुन धमकावणे, खंडणी उकळणे अशा गंभीर प्रकारची १० गुन्हे पोलीस ठाण्याच्या रेकार्डवर आहेत.
या गुन्ह्यापासून तो परावृत्त व्हावा म्हणून पोलिसांनी सन २०२१ मध्ये कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपार कारवाई केली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली नाही. त्याने गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवले. अखेर सामाजिक हितास बाधा येत असल्याने पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी त्याच्याविरुद्ध १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबद्धतेचे आदेश काढले. आणि त्याची येरवडा तुरुंगात रवानगी केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, अश्विनी भोसले, फौजदार विशेंद्रसिंग बायस आदिच्या सहकार्याने केली.