सांगली : पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील वसंतनगर भागात धारदार शस्त्राने वार करून तिघांची हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या मारामारीच्या या घटनेत आणखी चौघे गंभीर जखमी झाले आहेत. तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने तालुक्यासह जिल्हा हादरला आहे.
अरविंद बाबुराव साठे (वय ६०), सनी आत्माराम मोहिते (वय ४०), विकास आत्माराम मोहिते (३६) अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेत स्वप्नील साठे, दिलीप साठे, संग्राम मोहिते, आकाश मोहिते हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. घटनास्थळी जिल्ह्यातून पोलिसांची कुमक पाठविण्यात आली आहे. या घटनेने दुधोंडी परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. दुपारी अडिच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. चाकू, गुप्ती, काठ्यांसह अन्य धारदार शस्त्रांसह दगडाचाही वापर करुन हल्ला करण्यात आला. तासभर ही धुमश्चक्री सुरु होती. दोन्ही गटातील दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली.
याप्रकरणी प्रवीण विलास मोहिते, आदित्य विलास मोहिते, हिम्मत मधुकर मोहिते, विजय मधुकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगीता मधुकर मोहिते, मधुकर धोंडीराम मोहिते या संशयित आरोपींवर कारवाईसाठी पोलिसांचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होते.एकमेकांचे नातलगदोन्ही गटातील हल्लेखोर व मृत हे एकमेकांचे नातेवाईक असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले आहे. या दोन्ही गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद धुमसत होता. रविवारी दुपारी तो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उफाळून आला. त्यातून ही घटना घडल्याचे समजते.