अहमदाबाद – ४२ वर्षीय तरूण जिनराज २००३ पासून पोलिसांच्या तावडीतून फरार होता. ‘व्हॅलेटाईन डे’ला पत्नी सजनी नायरची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. तरूण केरळचा राहणारा होता. तो गुजरातच्या अहमदाबाद येथे पीटी शिक्षक म्हणून शाळेत शिकवायला होता. २००२ मध्ये केरळात राहणाऱ्या सजनीसोबत तरूणचं लग्न झाले होते.
२००३ मध्ये १४ फेब्रुवारी ‘व्हेलेंटाइन डे’ला अहमदाबादच्या बोपल परिसरात एक हत्या झाल्याची सूचना पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी घराच्या तिसऱ्या मजल्यावर एक व्यक्ती महिलेच्या मृतदेहाशेजारी बसून रडत होता. तो रडणारा व्यक्ती तरूण होता, मृत महिला त्याची पत्नी होती. पोलिसांच्या चौकशीला घाबरून तो पत्नीच्या मृत्यूचा धक्का लागल्याचं बहाणा बनवून हॉस्पिटलमध्ये भरती झाला. त्यानंतर संधी साधताच तो हॉस्पिटलमधून फरार झाला.
पोलिसांनी खूप शोध घेतला परंतु फरार पती तरूण सापडला नाही. त्यानंतर कालांतराने हे प्रकरण थंड झाले. पोलिसांनीही शोध थांबवला. त्यानंतर २०१६ मध्ये तरुणसारखा दिसणारा व्यक्ती दिल्लीतील मॉलमध्ये पाहिल्याचं पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांची आणि मित्रांचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यात त्याच्या आईच्या नंबरवर बंगळुरूहून प्रविण भटेले नावाच्या व्यक्तीचे कॉल आल्याचं आढळलं. पोलिसांनी संबंधित व्यक्तीबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलिसांना कळालं की, प्रविण भटेले हा तरूणचा मित्र होता तो ओळख लपवून राहत होता. त्यानंतर आरोपीची मदत केल्याप्रकरणी प्रविणवर गुन्हा दाखल झाला. प्रविणला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तरूणला त्याच्या नंबरवरून फोन केला. तेव्हा तरूणने कॉल उचलल्यानंतर त्याची ओळख पटली. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करत एका फोन कॉलच्या सहाय्याने तरूणला ताब्यात घेतले. तरूण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करू इच्छित होता. त्यासाठी त्याने पत्नीचा काटा काढला. फरार झाल्यानंतर तरूणने बंगळुरूमध्ये दुसरं लग्न केले होते.