मुंबई - राज्याच्या पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेल्या आणि राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या हेमंत नगराळे राज्य सुरक्षा मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांची मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तहेमंत नगराळे यांची राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. आज सायंकाळ सहा वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे माध्यमांशी संवाद साधणार होते. मात्र, तासभर थांबवल्यानंतर, पांडे यांनी आज संवाद साधणार नसल्याचे सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश सिंग खटल्याचा निकालावेळी डीजीपीच्या नियुक्तीसाठी निर्देश दिले आहेत. त्यानुसार या पदासाठी राज्य सरकारकडून यूपीएससीची निवड समितीकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्यांनी निश्चित केलेल्या तीन जणांपैकी एकाची निवड राज्य सरकार करू शकते. जायसवाल ७ जानेवारीला कार्यमुक्त झाल्यानंतर १७ मार्चपर्यंत हेमंत नगराळे तर ९ एप्रिलपर्यंत रजनीश सेठ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. तर १० एप्रिलपासून पांडे यांच्याकडे कार्यभार होता. आता पूर्णवेळ रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस दलात काही फेरबदल करून काही आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली. १९८६ च्या बॅचचे म्हणजेच सर्वात वरिष्ठ असूनही पोलीस महासंचालकपदी नियुक्ती न केल्याने संजय पांडे यांनी राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे एक आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी उचलबांगडी केल्यानंतर मुंबईचे आयुक्तपद रिक्त झाले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी असलेले हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी नियुक्त करण्यात आली होती आणि महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती केली गेली होती. तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली. या बदलीनंतर संजय पांडे यांच्या तुलनेने त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्याला महासंचालक नेमण्यात आले. रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यामुळे पांडे नाराज होते.