कोलकाता - शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या पत्नीने कोलकाता हायकोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नुकतीच सीबीआयच्या पथकाने राजीव कुमार यांच्या घरावर छापेमारी केली असून कुमार यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयच्या विशेष पथके भाबनी भवनस्थित सीआयडी कार्यालयासह शहरातील अनेक कार्यालयांत दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त यांचा माग काढण्यासाठी सीबीआयचे पथक दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील एका रुग्णालयात देखील पोचले होते.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या खास मर्जीतील पोलीस अधिकारी आणि कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार चौकशीसाठी १४ सप्टेंबरला सीबीआयसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे सीबीआयने चौकशीच्या नाड्या आवळत भूमिगत झालेल्या राजीव कुमार यांचा माग काढण्यासाठी कंबर कसली आहे. बंगालमधील गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिट फंडच्या घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी १४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता कोलकाता येथील सीजीओ कॉम्प्लेक्सच्या ऑफिसमध्ये हजर राहण्यासठी सीबीआयने राजीव कुमार यांना नोटीस पाठवली होती. कोलकाता हायकोर्टाने नुकताच राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती हटविल्याने सीबीआयने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. न्यायालयाने राजीव कुमार यांच्या अटकेवरचा स्थगिती रद्द करताना, त्यांची सीबीआयचा समन्स रद्द करण्याचीही मागणी फेटाळली होती. राजीव कुमार यांनी या समन्सला उत्तर दिले नाही. तसेच ते भूमिगत झाले. दरम्यान, कुमार यांच्या पत्नीने कोलकाता हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.कोलकाताचे माजी आयुक्त राजीव कुमार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. सीबीआयने आरोप केला आहे की बड्या नेत्यांना वाचवण्यासाठी कुमार यांनी घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
शारदा चिट फंड घोटाळा : राजीव कुमारांच्या अटकपूर्व जामिनासाठी पत्नीची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 7:04 PM
कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या पत्नीने कोलकाता हायकोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला
ठळक मुद्देसीबीआयने आरोप केला आहे की बड्या नेत्यांना वाचवण्यासाठी कुमार यांनी घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. कोलकाता हायकोर्टाने नुकताच राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती हटविल्याने सीबीआयने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. सीबीआयने चौकशीच्या नाड्या आवळत भूमिगत झालेल्या राजीव कुमार यांचा माग काढण्यासाठी कंबर कसली आहे.