मुंबई : अँटोपहीलमध्ये गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३१ लाखांचा ऐवज लंपास करुन सराफ पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमाराम पटेल असे सराफाचे नाव असून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे.
अँटॉपहील येथील रहिवासी असलेल्या कालीमाराज देवेंद्र या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाच्या बचतीमधून त्यांनी काही प्रमाणात सोने खरेदी केले होते. कोरोना काळात आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे जानेवारी २०२२ मध्ये कालीमाराज यांनी त्यांच्या जवळील पाच तोळे सोने येथील सत्यम ज्वेलर्सचा मालक सोमाराम पटेल याच्याकडे गहाण ठेऊन प्रति महिना दोन टक्के व्याजाने २४ हजार घेतले.
कालीमाराज या नियमित व्याजाची रक्कम भरत होत्या. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी घेतलेले २४ हजार रुपये पटेल याला परत करुन गहाण ठेवलेले सोने परत मागितले. सोने आज देतो. उद्या देतो असे सांगून तो टाळाटाळ करु लागला. २८ नोव्हेंबरला पटेल दुकान बंद करून पसार झाला. त्याचा मोबाईल क्रमांकही बंद लागल्याने त्यांना संशय आला. त्यांच्याप्रमाणेच पटेल याने आणखी काही जणांचे गहाण ठेवलेले दागिने आणि रक्कम सोबत नेली होती. अखेर कालीमाराज यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अँटॉपहील पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. पटेल याने त्यांच्यासह एकूण १३ जणांची ३१ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी पटेल विरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.